जुन्या कांबी-मुंगी रस्त्याच्या कामाला सुरुवात; रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचा शासनस्तरावर पाठपुरावा
अहिल्यानगर, शेवगाव | प्रतिनिधी | 20 ऑक्टोबर 2026
राज्यात पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असूनग्रामीण भागातील मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत गरजू व बेरोजगार मजुरांना गावातच काम मिळावे, या उद्देशाने सिद्धार्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, कांबी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. संस्थेच्या प्रयत्नांमुळे जुन्या कांबी ते मुंगी रस्त्याच्या कामाला सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरुवात करण्यात आली.
ग्रामीण भागातील गरीब व गरजू मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या उपजीविकेला हातभार लावण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंत बाबुराव साबळे, सचिव संतोष भुजंगा पटवेकर आणि डॉ. सचिन दळवी यांनी महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. व्ही.बी.-जी. राम जी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गावातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली होती.
या पाठपुराव्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अहिल्यानगरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्ही.बी.-जी. राम जी कक्षातील संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवक आणि ग्रामरोजगार सहाय्यक यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
त्यानंतर कांबी गावात जुन्या कांबी ते मुंगी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या कामामुळे स्थानिक मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
कामाच्या प्रारंभी कांबी ग्रामपंचायतीचे प्रशासक अधिकारी गोकुळ बळीद, रोजगार सेवक भाऊसाहेब नरके यांच्यासह मोठ्या संख्येने मजूर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन शासनदरबारी पाठपुरावा करणे आणि शासकीय योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे, या संस्थेच्या भूमिकेचे स्थानिक पातळीवर महत्त्व अधोरेखित होत आहे.
